भारतात लठ्ठपणा कमी करणाऱ्या औषधांच्या बाजारपेठेत गेल्या पाच वर्षांत सहापटीने वाढ झाली आहे.
मुंबई येथील मधुमेह (डायबेटिस) तज्ज्ञ राहुल बक्षी यांना सतत फोन येत असतात. पण त्यांना हे फोन केवळ रक्तातील साखर नियंत्रित न होणाऱ्या रुग्णांकडूनच म्हणजे मधुमेह असलेल्या रूग्णांकडूनच येत नाहीत.
आता तर तरुण व्यावसायिक लोकही एकच प्रश्न विचारताना दिसतात- "डॉक्टर, मला वजन कमी करण्याचं औषध सुरू करता येईल का?"
अलीकडेच 23 वर्षांचा एक तरुण राहुल बक्षींकडे आला. त्याला आपल्या वजनाबद्दल चिंता होती. कॉर्पोरेट नोकरीला लागल्यापासून त्याचं वजन 10 किलोने वाढलं होतं.
तो म्हणाला, "माझ्या जिममधील एक मित्र वजन कमी करणारं इंजेक्शन घेतो."
डॉ. बक्षी यांनी त्याला औषध देण्यास नकार दिला आणि विचारलं, "औषध घेऊन 10 किलो वजन कमी झाल्यावर पुढे काय करशील?"ते म्हणाले, "औषध थांबवलं की वजन परत वाढतं, आणि जर व्यायाम न करता औषध चालू ठेवलंस, तर स्नायू (मसल्स) कमी होऊ लागतात. ही औषधं योग्य आहार आणि जीवनशैली बदलाची जागा घेऊ शकत नाहीत."
अशा प्रकारच्या चर्चा आता भारतातील शहरांमध्ये खूपच वाढल्या आहेत. कारण वजन कमी करणाऱ्या औषधांच्या मागणीत झपाट्याने वाढत आहे.
भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अति लठ्ठ प्रौढ लोक आहेत आणि तब्बल 7.70 कोटी लोक टाइप-2 डायबेटिसने ग्रस्त आहेत.
पचन मंदावतं, भूकही कमी करतं
मुळात मधुमेहावर उपचार करण्यासाठी तयार केलेली ही औषधं आता वजन कमी करण्यासाठी 'गेम चेंजर' म्हणून ओळखली जात आहेत. कारण त्यांचे परिणाम आधीच्या कोणत्याही उपचारांपेक्षा प्रभावी मानले जातात.
पण या औषधांची वाढती लोकप्रियता काही कठीण प्रश्नही निर्माण करते, जसं की डॉक्टरांच्या देखरेखीची गरज, चुकीच्या वापराचे धोके, आणि उपचार व जीवनशैली सुधारणा यांच्यातील अस्पष्ट रेषा.
दिल्लीतील फोर्टिस सी-डीओसी सेंटरचे प्रमुख आणि डायबेटिस व मेटाबॉलिक एंडोक्राइनोलॉजीचे तज्ज्ञ अनूप मिश्रा म्हणतात की, "वजन कमी करण्यासाठीची ही आतापर्यंतची सर्वात प्रभावी औषधं आहेत. यापूर्वी अनेक औषधं आली आणि गेली, पण या औषधांशी तुलना होऊ शकत नाही."
भारतातील वेगाने वाढणाऱ्या वजन कमी करणाऱ्या औषधांच्या बाजारपेठेत सध्या दोन नवीन औषधांचा दबदबा आहे.
पहिलं म्हणजे सेमॅग्लुटाइड. हे डॅनिश औषध कंपनी नोवो नॉर्डिस्ककडून तयार केलं जातं. ते रायबेल्सस या नावाने गोळ्यांच्या स्वरूपात आणि वेगोवी या नावाने इंजेक्शनच्या स्वरूपात विकलं जातं.
ओझेम्पिक हेही याच औषधाचं इंजेक्शन आहे, जे भारतात मधुमेहासाठी मंजूर आहे, पण लठ्ठपणा कमी करण्यासाठी अजून ते उपलब्ध नाही.
दुसरं औषध म्हणजे टिर्झेपटाइड. हे अमेरिकन कंपनी एली लिलीकडून तयार केलं जातं आणि माउनजारो या नावाने विकलं जातं. हे मुख्यतः मधुमेहासाठी, पण भारतात आता वजन कमी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.
ही दोन्ही औषधं जीएलपी-1 नावाच्या वर्गातील आहेत. ही औषधं शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोनचं अनुकरण करतात.
पचन थोडं मंद करून आणि मेंदूमधील भूक नियंत्रित करणाऱ्या भागावर परिणाम करून ही औषधं माणसाला लवकर पोट भरल्यासारखं वाटायला लावतात आणि ते समाधान जास्त वेळ टिकतं.
काही आठवड्यातच कमी होऊ लागतं वजन
ही औषधं शक्यतो आठवड्यातून एकदा घेतली जातात आणि हात, मांड्या किंवा पोटात इंजेक्शनद्वारे स्वतःच द्यायची असतात.
ही औषधं भूक कमी करतात, आणि माउनजारोच्या बाबतीत तर ते शरीराचे मेटाबॉलिझम आणि ऊर्जा संतुलनही सुधारतात.
उपचाराची सुरुवात कमी डोसपासून (मात्रा) केली जाते आणि हळूहळू ती स्थिर किंवा कायम डोसपर्यंत वाढवली जाते. यामुळे काही आठवड्यांतच वजन कमी होण्यास सुरूवात होते.
डॉक्टर इशारा देतात की, औषध घेणं बंद केल्यानंतर एका वर्षाच्या आत अनेकांचं वजन परत वाढतं. कारण शरीर वजन कमी होण्याला प्रतिकार करतं आणि जुन्या खाण्याच्या सवयी पुन्हा सुरू होतात.
तसंच, व्यायाम किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगशिवाय ही औषधं दीर्घकाळ वापरल्यास फक्त चरबीच नाही तर स्नायूही कमी होतात.
सर्व लोकांना जीएलपी-1 औषधांचा सारखाच परिणाम होत नाही. बहुतेक लोकांचं वजन आपल्या शरीराच्या सुमारे 15 टक्के इतकं कमी झाल्यावर स्थिर राहतं.
या औषधांचे काही दुष्परिणामही (साइड इफेक्ट्स) असतात, जसं की मळमळ, जुलाब, आणि काही दुर्मिळ पण गंभीर समस्या जसं की पित्ताशयात खडे (गॅलस्टोन), स्वादुपिंडदाह (पँक्रियाटायटिस) आणि मसल्स कमी होणे.
भारतामध्ये आधीच जास्त कार्बोहायड्रेट आणि कमी प्रथिने असलेला आहार घेतला जातो. ज्यामुळे सार्कोपेनिक ओबेसिटी (लठ्ठपणा) म्हणजेच चरबी वाढताना स्नायू कमी होण्याची समस्या दिसते.
त्यामुळे पुरेशा प्रमाणात प्रथिनं आणि व्यायामाशिवाय वजन कमी करणं यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते.
डॉ. बक्षी म्हणतात, "माध्यमं आणि सोशल मीडियावर या औषधांची खूप चर्चा सुरू आहे. त्यामुळे काही किलो वजन कमी करण्याची घाई असलेल्या श्रीमंत भारतीयांमध्ये ही औषधं आता एक प्रकारची फॅशन किंवा क्रेझ बनली आहेत."
